नमस्कार माझा श्री स्वामी समर्था
ॐ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् |
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् |
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ||
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे |
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ||
ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पदम् |
मंत्र मूलं गुरु: वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा ||
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ||
इदमेव शिवम् इदमेव शिवम् | इदमेव शिवम् इदमेव शिव: ||
तारक मंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मना रे | प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे |
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी | अशक्यही शक्य करतील स्वामी ||१||
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय | स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकीही ना भिती तयाला ||२||
उगाची भितोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे |
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा | नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ||३||
खरा होई जागा तू श्रध्देसहित | कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त |
कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात |
हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती | न सोडी तया स्वामी ज्या घेई हाती ||५||
मानसपूजा
नमो स्वामीराजं दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्तीरुपम् |
ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय | स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||१||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा | मला ध्यानमूर्ती दिसू येई डोळा |
कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा | समर्था तुम्हाविण हो जीव कैसा ||२||
स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी | हृदयासनी या बसा प्रार्थितो मी |
पूजेचे यथासांग साहित्य केले | मखरात स्वामी गुरु बैसविले ||३||
महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती | जिथे सर्व सिध्दी पदी लोळताती |
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ | परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त ||४||
सुवर्णताटी महारत्न ज्योती | ओवाळूनी अक्षता लावू मोती |
शुभारंभ ऐसा करुनी पुजेला | चरणावरी ठेऊ या मस्तकाला ||५||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा | तुझी पाद्यपुजा करी बाळ तुझा |
प्रणिपात साष्टांग शरणागताचा | तुम्हा वाहिला भार या जीवनाचा ||६||
ही ब्रह्मपुजा महाविष्णू पूजा | शिवशंकराची असे शक्तीपूजा |
दही दूध शुध्दोदकाने तयाला | पंचामृत स्नान घालू प्रभूला ||७||
वीणा तुताऱ्या किती वाजताती | शंखादी वाद्ये पहा गर्जताती |
म्हणती नगारे गुरुदेव दत्त | श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्थ ||८||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली | श्री दत्त स्वामीसिया स्नान घाली |
महासिध्द पदतीर्थ घ्याया | महिमा तयाचा कळे ना जगा या ||९||
मी धन्य झालो हे तीर्थ घेता | घडू दे पूजा ही यथासांग आता |
अजानूबाहू भव्य कांती सतेज | नसे मानवी देह हा स्वामीराज ||१०||
प्रत्यक्ष श्री सदगुरु दत्तराज | तया घालुया रेशमी वस्त्रसाज |
सुगंधित भाळी टिळा रेखियेला | शिरी हा जरी टोप शोभे तयाला ||११||
वक्षःस्थळी लाविल्या चंदनाचा | सुवास तो वाढवी भाव साचा |
शिरी वाहुया बिल्व तुलसीदलाते | गुलाब जाईजुई अत्तराते ||१२||
गंधाक्षता वाहूनी या पदाला | ही अर्पूया जीवन पुष्पमाला |
चरणीं करांनी मिठी मारु देई | म्हणे "लेकरासी सांभाळ आई" ||१३||
इथे लावुया केशर कस्तुरीचा | सुगंधित हा धूप नाना प्रतीचा |
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली | गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली ||१४||
करुणावतारी अवधूत किर्ती | दयेची कृपेचीच जी शुध्द मूर्ती |
प्रभा फाकली शक्तीच्या मंडलाची | अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची ||१५||
ह्रदयमंदिराची ही स्नेहज्योती | मला दाखवी स्वामींची योगमूर्ती |
करु आरती आर्तभावे प्रभूची | गुरुदेव ही स्वामी दत्तात्रयाची ||१६||
पंचारती ही असे पंचप्राण | ओवाळूनि ठेऊ चरणावरुन |
निघेना पुढे शब्द बोलु मी तो ही | मनीचे तुम्ही जाणता सर्व काही ||१७||
हे स्वामीराजा बसा भोजनाला | हा पंचपक्वान्न नैवेद्य केला |
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची | लाडू करंजी असे ही खव्याची ||१८||
डाळींब द्राक्षे फळे आणि मेवा | केशरी दूध घ्या स्वामीदेवा |
पुढे हात केला या लेकराने | प्रसाद द्यावा आपुल्या कराने ||१९||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था | चरणाची सेवा करु द्यावी आता |
प्रसन्नेतुन मागू मी काय | हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ||२०||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ | दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ |
नका दूर लोटू आपल्या मुलासी | कृपाछत्र तुमचेच या बालकासी ||२१||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला | पदी ठेऊ दे शीर शरणागताला |
हृदयी भाव यावे असे तळमळीचे | करी पूर्ण कल्याण हे या जीवाचे ||२२||
तुझे बाळ पाही तुझी वाट देवा | नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा |
मनी पुजनाची असे दिव्य ठेव | वसो माझिया अंतरी स्वामी देव ||२३||
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थाष्टक
असे पातकी दीन मी स्वामीराया | पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया |
नसे अन्य ञाता जगी या दीनाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||१||
मला माय ना बाप ना आप्तबंधू | सखा सोयरा सर्व तू दीनबंधू |
तुझा मात्र आधार या लेकराला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||२||
नसे शास्त्र, विद्या, कलादिक काही | नसे ज्ञान वैराग्य ते सर्वदा ही |
तुझे लेकरू ही अहंता मनाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||३||
प्रपंची पुरा बध्द झालो दयाळा | तुझा दास मोही स्मृती ना मनाला |
क्षमेची असे याचना त्वत्पदाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||४||
मला काम क्रोधादिकी नागविले | म्हणोनी समर्था तुला जागविले |
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||५||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई | तुझ्याविण नाही दुजी श्रेष्ठ आई |
अनाथांसि आधार तुझा दयाळा | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||६||
कधी गोड वाणी न येई मुखाला | कधी द्रव्य न अर्पिले याचकाला |
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||७||
मला एवढी घाल भिक्षा समर्था | मुखी नित्य गावी तुझी गुण गाथा |
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||८||
स्वामी आशीर्वचन
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते |
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||
हम गया नही जिंदा है |
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो |
हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो ||
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थांची आरती – १
जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था |
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ||धृ||
छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी |
जग उद्धारासाठी राया तु फिरसी |
भक्तवत्सल खरा तु एक होसी |
म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी |
जय देव जय देव० ||१||
त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार |
त्याची काय वर्णु लीला पामर |
शेषादिक शिणले न लगे त्या पार |
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार |
जय देव जय देव० ||२||
देवाधिदेवा तु स्वामी राया |
निर्जन मुनीजन ध्याती भावे तव पाया |
तुजसी अर्पण केली आपुली ही काया |
शरणागता तारी तु स्वामी राया |
जय देव जय देव० ||३||
अघटीत लीला करुनी जडमुढ उध्दरिले |
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे |
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले |
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे |
जय देव जय देव० |४||
श्री स्वामी समर्थांची आरती – २
जय देव जय देव, जय जय अवधूता, स्वामी अवधूता |
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता | ||धृ||
तुझे दर्शन होता जाती ही पापे |
दर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते |
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते |
वैकुंठीचे सुख नाही या परते ||
जय देव जय देव ||१||
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा |
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा |
शरणागत तुज होता भय पडले काळा |
तुझे दास करिती सेवा सोहळा ||
जय देव जय देव ||२||
मानवरुपी काया दिससी आम्हांस |
अक्कलकोटी केले यतिवेषे वास |
पूर्णब्रम्ह तूची अवतरला खास |
अज्ञानी जीवास विपरीत हा भास ||
जय देव जय देव ||३||
र्निगुण र्निविकार विश्वव्यापक |
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक |
अनंत रुपे धरसी करणे मायिक |
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख ||
जय देव जय देव ||४||
घडता अनेक जन्मे सुकृत हे गाठी |
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी |
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी |
शरणागत दासावरी करी कृपा दृष्टी ||
जय देव जय देव ||५||
कर्पूरारती
कापूराची वात ओवाळु तुजला, स्वामी ओवाळु तुजला |
देहभाव अहंकार सहजी जाळीला ||धृ||
दया क्षमा शांती ह्या उजळल्या ज्योती, स्वामी उजळल्या ज्योती|
स्वयंप्रकाश रुप देखिली स्वामींची मुर्ती ||
कापूराची वात० ||१||
मी तु पण काजळ काजळी गेली, स्वामी काजळी गेली |
निजानंदे तनु स्वामी पायी अर्पियेली ||
कापूराची वात० ||२||
आनंदाने भावे कापूर्रारती केली, स्वामी कर्पूरारती केली |
पंचतत्व भाव तनु पायी अर्पियेली ||
कापूराची वात० ||३||
क्षमा प्रार्थना
अपराध क्षमा आतां केला पाहिजे |
गुरु हा केला पाहिजे ||
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ||धृ||
न कळेची टाळ वीण वाजला कैसा |
गुरु हा वाजला कैसा ||
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा ||१||
नाही ताल ज्ञान कंठ सुस्वर |
गुरु हा कंठ सुस्वर ||
झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ||२||
निरांजन म्हणे देवा वेडेवाकुडे |
गुरु हे वेडेवाकुडे ||
गुण दोष न लावावा सेवकाकडे ||३||